सफाई कामगारांच्या भत्त्यात वाढ करा

सफाई कामगारांच्या भत्त्यात वाढ करा

राज्य सफाई कामगार आयोगाचे आदेश

साफसफाईचे काम करताना सफाई कामगारांना अत्यावश्यक साधने मिळणे गरजेचे असून कामगारांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. नियमानुसार सफाई कामगारांना पदोन्नती देणे, मोफत घर योजना राबवणे, आरोग्य विमा आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना देत राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांनी सफाई कामगारांच्या भत्त्यात ७० रुपयांवरून ४०० रुपये वाढ करण्याचे आदेश भिवंडी महापालिका प्रशासनाला दिले.

भिवंडी महानगरपालिकेला भेट दिल्यानंतर सारवान यांनी प्रशासन आणि कर्मचारी प्रतिनिधींसोबत झालेल्या संयुक्त बैठकीत आदेश दिले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यासह अन्य पालिका अधिकारी उपस्थित होते. यावेळी सारवान म्हणाले की, शहराच्या विकासात सफाई कामगारांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. सफाई कामगारांमुळेच शहर स्वच्छ राहते. ते स्वत: घाणीत काम करतात. त्यामुळे या कामगारांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असून त्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने मूलभूत सोयी पुरवणे आवश्यक आहे. सफाई कामगारांना न्याय देणे, त्यांचे प्रश्न मार्गी लावणे हेच आयोगाचे मुख्य काम असल्याचे ते म्हणाले. तर, सफाई कामगारांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मोफत घरकुल योजना, त्यांना नियमित देण्यात येणारे भत्ते, कामगारांच्या आरोग्याची वैद्यकीय तपासणी, सोयीसुविधा आदींची माहिती पालिका आयुक्तांनी आयोगाला दिली. प्रत्येक सफाई कामगाराचे प्रश्न सोडवले जातील. महापालिकेच्या आकृतिबंधास मंजुरी मिळाल्यानंतर कामगारांना नियमानुसार पदोन्नती देण्यात येईल. तसेच, शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या निकषानुसार सफाई कामगारांची भरती करण्यात येईल, आदी आश्वासने पालिका आयुक्तांनी आयोगाला दिले.

यावेळी आयोगाचे उपाध्यक्ष आणि पालिका आयुक्त यांनी संयुक्तपणे सफाई कामगारांचे प्रतिनिधी म्हणून आत्माराम चव्हाण आणि कमला दिनेश चव्हाण यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. या प्रसंगी आयोगाचे सचिव फकीरचंद चावरीया तसेच इतर सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.