तलाठी व वाहनचालक भरतीत गैरप्रकार

सह्यांमुळे भरतीतील गैरप्रकार उघड

तलाठी व वाहनचालक भरतीत डमी उमेदवार दिल्याचा प्रकार मूळ उमेदवार व डमी उमेदवारांच्या सह्यांतील तफावतीतून उघडकीस आला. त्यानंतर परिक्षा केंद्रामधील व्हिडिओ शुटिंग व उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात आल्यानंतर भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा निष्कर्ष जिल्हा निवड समितीने काढून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिला. त्यानुसार दहा जणांविरुद्ध गुरुवारी रात्री तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या तलाठीपदाच्या नऊ व वाहनचालकाच्या चार पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. या वर्षांत १२ जानेवारी रोजी नगरच्या न्यू आर्ट्स व न्यू लॉ कॉलेजच्या केंद्रावर लेखी परिक्षा झाली. तलाठी पदासाठी ४४२ आणि वाहनचालक पदासाठी ३६ उमेदवारांनी परिक्षा दिली होती. त्यानंतर लेखी परिक्षेचे पेपर तपासल्यानंतर उमेदवारनिहाय मिळालेली गुणांची प्रारुप यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली होती. त्यानंतर लेखी परिक्षांच्या वेळी पेपरवरील सह्या व ऑनलाइन अर्जांवरील उमेदवारांच्या सह्यांची तपासणी अधिकारी करीत असताना काही सह्यांमध्ये तफावत आढळून आल्याने डमी उमेदवाराने परिक्षा दिल्याचा संशय निर्माण झाला. परिक्षा केंद्रातील व्हिडिओ शुटिंग तपासल्यानंतर अर्ज करणारे व परिक्षा केंद्रात परिक्षा देत असलेले उमेदवार वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुरुवारी प्रारुप यादीमधील १३ उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यात दहा जण हजर होते. त्या सर्वांना परिक्षा कुठे दिली, बैठक क्रमांक किती होता, अशी प्राथमिक माहिती विचारल्यानंतर विशाल इंगळे, अंजली म्हस्के, मंगेश दांडके यांना व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे जिल्हा निवड समितीला गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. पकडलेल्या तिघांना तोफखाना पोलिस स्टेशनच्या ताब्यात देऊन त्यांच्यासह इतर सात असे दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

डमी बसवून आला अव्वल

या परिक्षेत डमी उमेदवार बसवून विशाल इंगळे हा दोनशे गुणांपैकी सर्वाधिक १८२ गुण मिळाल्याने यादीत पहिला आला होता. तर अंजली म्हस्के हिला मुलींमध्ये १६६ गुण आहेत. मंगेश दांडगे याला १६०, तर पंढरीनाथ साबळे याला १६० गुण होते. हे चौघेही तलाठी म्हणून भरती होणार होते. तर, रवी पवार याला शंभर गुण मिळाले असून, तो वाहनचालक म्हणून भरती होणार होता.

मोठे रॅकेट असल्याचा संशय

अटक करण्यात आलेले तिघे मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यातील आहेत. त्या ठिकाणावरून हे रॅकेट चालविण्यात येत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तपास करण्यात येत आहे. अटकेत असलेल्या तीन उमेदवारांकडे याबाबत चौकशी करण्यात येत आहे. अटक असलेल्या तरुणीने भरतीसाठी एकाला तब्बल बारा लाख रुपयांची रक्कम दिल्याचे तरुणी सांगत आहे.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.