भंडारा येथील जिल्हा परिषद भरती 2020 प्रक्रिया रद्

भंडारा येथील जिल्हा परिषद भरती प्रक्रिया रद्

जिल्हा निवड समितीमार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गातील तीन जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठा घोळ झाल्याचे समोर आल्याने जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी ही भरती प्रक्रियाच रद्द केली आहे. ही परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचे चार ऑपरेटर व चार परीक्षार्थ्यांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

भंडारा जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील ज्या कर्मचाऱ्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, अशांची सेवा समाप्त करून त्यांच्या जागी नवीन पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार, अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या २ जागांसाठी आणि कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा या एका जागेसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यानुसार, १२ जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी ३४१ व कनिष्ठ अभियंतापदासाठी १२१ उमेदवारांनी परीक्षा दिली. १३ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवायचे होते. त्यानंतर निकाल घोषित करावयाचा होता. सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार परिक्षार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त गुण प्राप्त झाल्याचे लक्षात आले. जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी स्वत: प्रश्नपत्रिकेची रचना केली होती. तसेच एकूण २०० गुणांपैकी कुणीही १५० पेक्षा अधिक गुण घेणार नाही, असे प्रश्न विचारण्यात आले होते. तरीसुद्धा काही परीक्षार्थ्यांना १९०, १८६, १७८ असे गुण मिळाले.

हा एकूणच प्रकार जिल्हाधिकाऱ्यांना शंकास्पद वाटल्याने त्यांनी ओएमआर मशिनद्वारे उत्तरपत्रिका तपासतानाच्या सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावेळी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या मुंबई येथील एएसबी सिस्टीम या एजन्सीचे ऑपरेटर उत्तरपत्रिकेची अदलाबदल करताना आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता परीक्षा अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीमध्ये तसेच स्वाक्षरीच्या शाईमध्येही तफावत आढळली. परीक्षा अधिकाऱ्यांनीही त्या उत्तरपत्रिकेवरील स्वाक्षरी आपली नसल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या परीक्षार्थ्यांना आपल्या कक्षात बोलावले. जे प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते त्याच प्रश्नांचे उत्तर त्यांना तोंडी विचारले. परंतु, एकही परीक्षार्थी व्यवस्थित उत्तर देऊ शकला नाही. ज्याला इंग्रजीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले, त्याला इंग्रजीतील एक वाक्यही धड बोलता येत नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्दशनास आले.

त्यामुळे मशिनमध्ये उत्तरपत्रिका तपासणाऱ्या ऑपरेटरने उत्तरपत्रिका बदलवून हा घोळ केल्याचे पुढे आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी बुधवारी रात्री भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुंबईतील एएसबी सिस्टीम या एजन्सीचे ऑपरेटर सागर उंबरकर, पवार, शुभम राऊत व अन्य एकासह चार परीक्षार्थ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. हे चार परीक्षार्थी भंडारा, ब्रह्मपुरी, वर्धा व गडचिरोली येथील आहेत. ही परीक्षा रद्द करून फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षार्थी म्हणाले, ‘आम्ही टोला लगावला’!

ज्या चार परीक्षार्थ्यांनी सर्वाधिक गुण प्राप्त केले होते, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कक्षात बोलावून तेच प्रश्न तोंडी विचारले. तेव्हा सर्वच परीक्षार्थ्यांनी, ‘आम्ही टोला लगावला’, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे हा सर्व प्रकार बनवाबनवीचा असल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील परीक्षांसाठी निलंबित केले आहे.

चंद्रपूर, गडचिरोलीला अलर्ट

भंडारा येथे परीक्षा घेणाऱ्या एएसबी सिस्टीम या कंपनीने वर्धा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली येथेही परीक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे असाच प्रकार त्या जिल्ह्यांमध्येही झाल्याचा अंदाज असल्याने जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत कळविले असून उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्यास सांगितले आहे. याशिवाय एएसबी सिस्टिम या कंपनीला ब्लॅक लिस्टेट केले आहे.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.