अंगणवाडी सेविकांची 50 टक्केच पदभरती करण्याच्या आदेशाने संभ्रम

अंगणवाडी सेविकांची 50 टक्केच पदभरती करण्याच्या आदेशाने संभ्रम

गेल्या कित्येक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांच्या भरती प्रक्रियेस राज्य शासनाची स्थगिती होती. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ही स्थगिती उठवून भरती प्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ही भरती रिक्‍त पदांच्या 50 टक्के प्रमाणात करण्यात यावी, असे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आल्याने या भरती प्रक्रियेबाबत प्रशासकीय संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे.

सोलापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्यात येते. जिल्ह्याभरातील अंगणवाडीत 158 सेविका, 31 मिनी अंगणवाडी सेविका व 393 मदतनीस यांची पदे रिक्‍त आहेत. राज्य शासनाने भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्याने ही रिक्‍त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भरती प्रक्रिया राबविताना राज्य शासनाने यापूर्वी घालून दिलेल्या निकषांवरच भरती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आले आहेत. मात्र, रिक्‍त पदांच्या 50 टक्के प्रमाणात म्हणजे नेमके किती पदे भरावीत, यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबिण्यात यावी, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया नेमक्या कोणत्या अटी व नियमांवर करायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

भरती प्रक्रियेसाठी जाहिरात कधी प्रसिद्ध करण्यात यावी, रिक्‍त पदांची 50 टक्के पदे कशी गृहीत धरण्यात यावीत, याबाबत जिल्हा परिषदेने  राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. येत्या काही दिवसांत याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन प्राप्‍त होण्याची अपेक्षा जि.प. प्रशासकीय यंत्रणेला आहे. त्यामुळे तूर्त तरी भरती प्रक्रियेतील नियमांच्या संभ्रमामुळे ही भरती प्रक्रिया रखडली गेली आहे.

अंगणवाडी सेविकांना दरमहा 9 हजार, तर सेविकांना 4 हजार 500 रुपये इतके मानधन देण्यात येते. अंगणवाडी सेविकांकरिता दहावी, तर मदतनीस यांच्याकरिता किमान सातवी उतीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक गावात दवंडी देऊन भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

Source: Pudhari

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.


साडेसहा हजार अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरणार: Anganwadi Sevika Bharti 2020

राज्यभरात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या सहा हजार ५०० रिक्त जागा भरण्यास मंजुरी देतानाच, भाडेतत्वावर सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतींच्या भाड्यात ग्रामीण भागासाठी चार हजार रुपये तर शहरभागासाठी सहा हजार रूपये मासिक भाडेवाढ करण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजेश सिंग यांनी शनिवारी दिली.

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांच्या राज्यभर रिक्त जागा आहेत. त्या त्वरित भरण्याची मागणी काही वर्षांपासून प्रलंबित होती. त्यावर लक्ष केंद्रीत करून या साडेसहा हजार जागा भरण्याचे आदेश ठाकूर यांनी विभागाच्या आढावा बैठकीत प्रशासनास दिले. याशिवाय अंगणवाडी केंद्राच्या तुटपुंज्या भाड्यामध्ये वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस पदे भरण्यावर तीन वर्षांपासून निर्बंध लावण्यात आले होते. आता हे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सेविका व मदतनीसच्या साडेसहा हजार जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेले ९८ अंगणवाडी केंद्र व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्र आवश्यकतेप्रमाणे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यभर रिक्त असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या रिक्त ४५ जागा भरण्याचे आदेशही ठाकूर यांनी यावेळी जारी केल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

मासिक भाड्यातही वाढ

राज्यभरात ३७ हजार ५४५ अंगणवाडी केंद्र भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. या इमारतीच्या भाड्यापोटी अत्यल्प रक्कम दिली जाते. आढावा बैठकीत त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण व आदिवासी भागातील केंद्रासाठी याआधी ७५० रूपये मासिक भाडे दिले जात असे. यापुढे त्यासाठी एक हजार रूपये निश्चित केले आहेत. शहरी भागातील केंद्रासाठी ७५० रूपये भाडे होते. ते आता चार हजार रूपये करण्यात आले.

महानगरामधील अंगणवाडी केंद्राचे भाडे ७५० रूपयांवरून सहा हजार रूपये करण्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

सौर्स : https://www.lokmat.com/