दहावी-बारावीचे हॉलतिकीट ऑनलाइन

दहावी-बारावीचे हॉलतिकीट ऑनलाइन

फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरून हॉलतिकीटाची प्रिंट काढता येणार असून यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

गेल्यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या पुणे विभागीय शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन हॉलतिकीट देण्यात आले होते. यात कोणतीही तांत्रिक अथवा इतर अडचण न उद्भवल्याने यंदाच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या दहावी, बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकिट देण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

हॉलतिकीट गहाळ झाल्यास दुसरी प्रिंट मिळणार

हॉलतिकीटाची पहिली प्रिंट गहाळ झाल्यास विद्यार्थ्याला शाळा, ज्युनियर कॉलेजमार्फत दुसरी प्रिंट दिली जाणार आहे. त्या प्रिंटवर लाल शाईने डुप्लीकेट प्रिंट असा शेरा असणार आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीटाची प्रिंट उपलब्ध करून देण्याची वेबसाईट आणि तारीख स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

  • शाळा आणि ज्युनियर कॉलेजनी बोर्डाच्या वेबसाईटवरून हॉलतिकीटाची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे.
  • हॉलतिकीटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापक/प्राचार्यांचा सही आणि शिक्का घेणे आवश्यक आहे.
  • हॉलतिकीटावर विषय, माध्यम बदल असतील तर त्या दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे येऊन करून घ्यायच्या आहेत.
  • हॉलतिकीटावरील विद्यार्थ्याची सही, नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ याविषयीच्या दुरूस्त्या शाळा आणि ज्युनियर कॉलेज स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे.
  • हॉलतिकीटावरील विद्यार्थ्याचा फोटो चुकीचा असल्यास त्याजागी फोटो चिकटवून त्यावर शिक्का आणि सही घेणे आवश्यक आहे.