‘महापरीक्षा’ काही संपेना | Mahapariksha Govt. Portal’s Issues

‘महापरीक्षा’ काही संपेना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर महापरीक्षा पोर्टलच्या परीक्षांना स्थगिती आली असली, तरी पोर्टलवर अर्ज नोंदणीसह उत्तरतालिका जाहीर होणे सुरूच असून, जाहिरातीनंतर वर्ष उलटत आले असले, तरी भरतीच्या परीक्षा न झाल्याने उमेदवारांची विवंचना कायम आहे. महापरीक्षा पोर्टल बंद होण्यासाठी उमेदवारांनी आंदोलन पुकारले असले, तरी त्यातील तेढ दूर होत नसल्याने ‘महापरीक्षा’ काही संपेना, असे मत उमेदवार व्यक्त करत आहेत.

सरकारी विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी ‘महापरीक्षा’ पोर्टलद्वारे अर्ज नोंदणी सुरू होती. भरती दरम्यान होणारा गोंधळ, अपारदर्शकता, सदोष निकालांमुळे उमेदवारांनी त्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. तलाठी, पशुसंवर्धन, जलसंपदा, पोलिस, वनरक्षक या सर्वच भरतीत महापरीक्षा पोर्टलचा त्रास उमेदवारांना सहन करावा लागला. तलाठी भरतीत प्रश्नपत्रिकाच सदोष असल्याचा दावा झाला, तर पशुसंवर्धनच्या परीक्षेला अडीच महिने उलटल्यानंतर मुहूर्त सापडला होता. या तक्रारींची दखल घेत पोर्टलच्या तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत सर्व परीक्षा स्थगित करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी देखील विधानसभेत महापरीक्षेला विरोध केला. त्यामुळे उमेदवारांमध्ये सकारात्मकता असली, तरी परीक्षा नेमक्या कशा होणार यासह पोलिस भरतीसाठीचे अर्ज मात्र महापरीक्षेवरच स्विकारले जात असल्याने, ही भरती होईल की, रद्द केली जाईल, याबाबत साशंकता कायम आहे. शिवाय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या लिपिक पदाच्या भरतीची उत्तरतालिका स्थगितीनंतर पोर्टलवर जाहीर झाल्याने उमेदवारांचा गोंधळ आणखीन वाढला आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करण्यापेक्षा हे पोर्टल थेट बंदच करा, अशी मागणी होत असून, त्याबाबत उमेदवारांना स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली जात आहे.

ऑफलाइनचा पर्याय हवा

महापरीक्षा पोर्टल बंद करून, राज्य लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत शासकीय विभागांची भरतीप्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली जात आहे. शिवाय परीक्षा पद्धती ऑफलाइन ठेवल्यास पारदर्शकता येईल, असेही उमेदवारांचे मत आहे. भरतीचे अर्ज सादर करून वर्ष उलटत आले असले, तरी परीक्षाही न झाल्याने संभ्रम अधिक वाढला असून, योग्य निर्णय जाहीर होण्याच्या अपेक्षेत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

महापरीक्षा पोर्टलच्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जाणार आहेत. पण, ते पोर्टलच बंद होणे गरजेचे आहे. शिवाय स्थगित परीक्षा नेमक्या किती महिन्यांत होणार याबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नसल्याने गोंधळ वाढतो आहे.

महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षांना स्थगिती दिली आहे. पण, पोर्टलवर अर्ज नोंदणी सुरूच आहे. त्यामुळे अर्ज सादर केल्यावर भरती होणार की नाही, याबाबत शंका कायम आहे. स्पष्ट माहितीच्या अभावामुळे अडचणीत आणखी वाढ होत आहे.

Source: maharashtratimes.indiatimes.com

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- [email protected] . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.